Wednesday, May 10, 2023

Marathi Vakprachar वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग (भाग 1)

 Marathi Vakprachar वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग (भाग 1)

          (भाग 2 साठी येथे क्लिक करा.

marathi-vakprachar
marathi-vakprachar


1. अटक करणे :- खूप मेहनत करून पोलिसांनी चोरांना अटक केली.

2. अपशब्द वापरणे :- खेळताना भास्करचा चेंडू लागताच, शंकरने भास्करविषयी रागाने अपशब्द वापरले.

3. अचंबा वाटणे :- आकाशात इन्द्रधनुष्य पाहताच, याचा लहान मुलांना अचंबा वाटला.

4. अभिमान वाटणे :- नितीनचा शाळेत पहिला नंबर येताच याचा त्याच्या बाबांना अभिमान वाटला.

5. अटकाव करणे :- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.

6.अठराविश्व दारिद्र्य : घरात कुणीच कमावणारे नसल्यामुळे रवीच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते.

7. अनुकरण करणे :- लहानसा गौरव नेहमी त्याच्या मोठ्या भावाचे अनुकरण करतो.

8. अभिप्राय देणे :- मी लिहिलेले पत्र सुंदर आहे, असा आमच्या सरांनी अभिप्राय दिला.

9. अभिवादन करणे :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी आम्ही त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

10. अवगत होणे - माहित होणे, कळणे, आकलन होणे.वाक्य पाच दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर चित्र कसे काढावे याची कला रामला अवगत झाली.

11. अवगत करणे - माहित करून घेणे.वाक्य सुषमाने ने इंग्रजी भाषा चांगलीच अवगत केली आहे.

12. अवहेलना करणे - अपमान करणे, अनादर करणे.वाक्य संतोषने पेन्सिल चोरल्याचे पाहताच सर्वांनी त्याची खूप अवहेलना केली.

13.अमर होणे - चिरकाल नाव राहणे.वाक्य ज्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले , ते वीर अमर झाले.

14.अहोरात्र झटणे - रात्रंदिवस कष्ट करणे.वाक्य या वर्षी शाळेत आपला पहिला नंबर यावा यासाठी गणेश अहोरात्र झटत होता.

15. अचूक वेध घेणे - न चुकता नेम साधणे.वाक्य सतीशने झाडावरील पिकलेल्या आंब्याचा अचूक वेध घेतला.

16.अवलंब करणे - अंगीकारणे, स्वीकारणे.वाक्य आम्ही नियमितपणे शाळेच्या नियमांचा अवलंब करतो.

17.अजरामर होणे - कायम स्मरणात राहणे.वाक्य – आपल्या देशासाठी जीवाचे बलिदान दिलेले सर्व देशभक्त अजरामर झाले.

18.अपशकुन मानणे - वाईट शंका येणे,प्रतिकूल घडण्याचा संकेत मिळणे.वाक्य – काही लोक रस्त्याने जाताना मांजर आडवी गेल्यास अपशकुन मानतात.

19. अद्दल घडणे - शिक्षा करणे.वाक्य- चोरांना पकडल्यानंतर तुरुंगात टाकून पोलिसांनी त्यांना चांगली अद्दल घडवली.

20.अचंबा वाटणे - नवल वाटणे, आश्चर्य वाटणे.वाक्य सर्कशीत सिंहाची कसरत पाहून सर्वांनाच अचंबा वाटला.

21.अपूर्व योग येणे - दुर्मीळ योग येणे.वाक्य - सूर्यग्रहण व चंद्रगहण एकाच दिवशी होण्याचा अपूर्व योग आला.

22. अमलात आणणे - कारवाई करणे.वाक्य शालेय नियमांचे पालन करण्याचा निर्णय सर्व विद्यार्थ्यांनी अमलात आणला.

23. अप्रूप वाटणे – नवल वाटणे,आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.वाक्य एवढ्या लहान स्नेहाचे नृत्य पाहून सर्व प्रेक्षकांना तिचे अप्रूप वाटले.

24. अवाक होणे - आश्चर्यचकित होणे.वाक्य जंगलात अचानक लागलेली आग पाहून सर्वजण अवाक झाले.

25. अभिनंदन करणे - कौतुक करणे.वाक्य बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवल्याने सर्वांनी कविताचे अभिनंदन केले.

26. अढी नसणे - मनात डंख न ठेवणे, मनात किल्मिष न ठेवणे.वाक्य - स्पष्ट बोलणे झाल्यामुळे तुकारामच्या मनात शंकरबद्दल कोणतीही अढी नव्हती.

27. अवसान गोळा करणे - धीर गोळा करणे.वाक्य - शेवटी अवसान गोळा करून शरदने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला.

28. अशुभाची सावली पडणे - विपरीत घडणे,अमंगल घडणे.वाक्य - लग्नानंतर दोन महिन्यातच पत्नीचा मृत्यू झाल्याने जणू रामवर अशुभाची सावली पडली.

29. अलगद उचलणे - सावकाश उचलणे.वाक्य कमलने आपल्या मुलाला अलगद उचलले.

30.असंतोष निर्माण होणे - चीड येणे, एखाद्या गोष्टीबद्दल खूप नाराजी निर्माण होणे.वाक्य - भारतीय लोकांमध्ये इंग्रजी राजवटीविरोधी असंतोष निर्माण झाला होता.

31. अधीर होणे - उत्सुक होणे.वाक्य बाबांनी नवीन आणलेली सायकल पाहण्यासाठी सतीश अधीर झाला होता.

32. अबाधित ठेवणे - बंधन न घालणे.वाक्य - वडिलांच्या निधनानंतर संतोषने शेतावरचा हक्क अबाधित ठेवला.

33. अन्नान दशा होणे - उपासमारीची पाळी येणे.वाक्य – अचानक उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेकडो गावातील लोकांची अन्नान दशा झाली.

34. अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.वाक्य आपल्याला परवडत नसलेल्या गोष्टीची अभिलाषा धरणे चांगले नाही.

35. अर्धचंद्र मिळणे - हकालपट्टी होणे.वाक्य लोकांची फसवणूक करणाऱ्यांना अर्धचंद्र मिळाला पाहिजे.

36.अवलंबून असणे :- विसंबून असणे. वाक्य-शंकरचे कुटुंब शंकरवर अवलंबून आहे.

37. अंगवळणी पडणे :- सुरुवातीला मशीनवर काम करताना सोपान घाबरला होता; पण हळूहळू मशीनवर काम करणे त्याच्या अंगवळणी पडले.

38. अंगी बाळगणे :- विद्यार्थ्यांनी चांगले गुण नेहमी अंगी बाळगावेत.

39.अंगीकार करणे :- सदूने आधुनिक शेती करण्याचा अंगीकार केला.

40.अंत होणे :- मुंगूसाने केलेल्या खूप जखमांमुळे सापाचा शेवटी अंत झाला .

41. अंदाज बांधणे :- सदुचा पडलेला चेहरा पाहून आईने तो नाराज असल्याचा  अंदाज बांधला.

42.आकलन होणे : शिक्षकांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे मला आकलन होते.

43. आदर बाळगणे : सर्व मुलांनी आई वडिलांचा व शिक्षकांचा आदर बाळगावा.

44. आनंदाचे भरते येणे : सहलीत नवनवीन ठिकाणे पाहून सविताला आनंदाचे भरते आले.

45. आरोळ्या ठोकणे :- हॉकीचा सामना जिंकल्यावर मुलांनी आनंदाने आरोळ्या ठोकल्या.

46.आव्हान देणे :- आपल्या मागावर असलेल्या वाघाला शेवटी हत्तीने आव्हान दिले.

47. आयात करणे :- देशातील वाढता कांद्याचा दर पाहून भारताने दुसऱ्या देशातून कांद्याची आयात केली.

48. आवाहन करणे :- कोरोनाचा वाढता प्रसार पाहून पंतप्रधानांनी जनतेला घरातच राहण्याचे आवाहन केले.

49. आळशांचा राजा :- दिनेश काहीच काम करत नाही, दिवसभर रिकामटेकडा बसलेला असतो. तो म्हणजे आळशांचा राजा आहे.

50. आश्चर्य वाटणे - भर उन्हात पाऊस पडल्याने मला याचे खूप आश्चर्य वाटले.

51. आश्चर्याने तोंडात बोटे घालणे :- दिनेशची कसरत पाहून रामने तोंडात बोटे घातली.

52. आश्चर्यचकित होणे :- दोरीवर चालणाऱ्या मुलीचे थरारक दृश्य पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.

53. आज्ञा पाळणे :- आपण नेहमी आईवडिलांची व गुरुजनांची आज्ञा पाळावी.

54. औक्षण करणे :- अर्थ-ओवाळणे.वाक्य-रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या बहिणीने राखी बांधल्यानंतर मला औक्षण केले.

55. इलाज नसणे :- अतिरेक्यांनी एवढ्या लोकांचे जीव घेतले की,त्यांना फाशीची शिक्षा देण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता.

56.उगम होणे - सुरुवात होणे.वाक्य - त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम होतो.

57. उधळून टाकणे - विखरून टाकणे.वाक्य – कुत्र्यांनी खेळता-खेळता धान्याची सर्व रास उधळून टाकली.

58. उत्कट प्रेम असणे - खूप गाढ प्रेम असणे.वाक्य - माझे माझ्या कुटुंबावर उत्कट प्रेम आहे.

59. उरी फुटून मरणे - अतिश्रमाने मरण येणे.वाक्य - पावसाच्या अभावी अन्न पिकवण्यासाठी शेतकरी उरी फुटून मरत आहेत.

60. उघड्यावर टाकणे - निराधार करणे, जबाबदारी झटकणे.वाक्य :-म्हातारपणात आपल्या आईवडीलांना उघड्यावर टाकलेल्या मुलांची शेजाऱ्यांनी कानउघडणी केली.

61. उदरनिर्वाह करणे - पोट भरणे, उपजीविका करणे.वाक्य – सदू लोकांच्या शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करतो.

62.उजळ माथ्याने फिरणे - उघडपणे वावरणे.वाक्य – अनेक अपराध करूनही बरेच लोक उजळ माथ्याने फिरतात.

63. उड्डाण करणे - झेप घेणे.वाक्य – अमेरिकेला जाणाऱ्या शंकरच्या विमानाने अखेर उड्डाण केले.

64. उपकार फेडणे - उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.वाक्य – आपल्याला मदत केलेल्या मुंगीचा जीव वाचवून कबुतराने  त्याचे उपकार फेडले.

65. उत्तेजन देणे - प्रोत्साहन देणे.वाक्य – नवोदय परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिनेशने आपल्या लहान भावाला  भरपूर प्रोत्साहन दिले.

66. उन्माद होणे - गुर्मी चढणे.वाक्य – अचानक 10 लाखाची लॉटरी लागण्याने संपतच्या वागण्यात उन्माद आला.

67. उंबरठा ओलांडणे - मर्यादा सोडणे.वाक्य – वाडीलांना वाटेल तसे बोलून कबीरने उंबरठा ओलांडला.

68. उंडारने - बागडणे, हुंदडणे.वाक्य – आपले काम सोडून गावभर उंडारने बरोबर नाही, हे वडील सदूला समजावून सांगत होते.

69. उत्कंठेने वाट पाहणे :- बऱ्याच वर्षांनी बाहेर देशातून येणाऱ्या आपल्या मुलाची वडील उत्कंठेने वाट पाहत होते.

70. उत्तीर्ण होणे :- सुरेश बारावी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला.

71. उन्हे उतरणे :- उन्हे उतरताना बाबा शेतातून घरी येतात.

72. ऋण फेडणे :-आईवडिलांची सेवा करून प्रत्येकाने त्यांचे ऋण फेडले पाहिजे.

73. एकजीव होणे :- गावात फिरणाऱ्या बिबट्याचा गावकऱ्यांनी एकजीव होऊन शोध घेतला.

74.  एकटा पडणे :- गावात सदूला कुणीही मदत करत नव्हते त्यामुळे तो एकटा पडला होता.

75. एक होणे :- देशावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व देश एक झाला.

76. ऐट दाखवणे :- बाबांनी नवीन आणलेली सायकल घेऊन रवी सर्वांना ऐट दाखवत होता.

77. कणीक तिंबणे - मार देणे.वाक्य – गावातील लोकांनी चोराची कणीक तिंबून चोरीची कबुली करून घेतली.

78. कळस होणे - चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा अतिरेक होणे.वाक्य-राजुने खोड्या काढण्याचा कळस केला.

79. कळीचा नारद - भांडणे लावणारा.वाक्य दोन घनिष्ठ मित्रांमध्ये भांडण लावणारा कळीचा नारद प्रभाकर होता.

80. कपाळाला आठ्या पडणे - नाराजी दिसणे.वाक्य गणेशचे प्रगतीपत्रक पाहून वडिलांच्या कपाळावर आठ्या पडल्या.

81.कच्छपी लागणे - एखाद्याच्या नादी लागणे.वाक्य – वाईट वर्तन असणाऱ्या माणसाच्या कच्छपी लागू नये.

82. कणव येणे - दया येणे.वाक्य - रस्त्यावर पडलेल्या पक्ष्याच्या पिल्लाला पाहून रामेशला त्याची कणव आली.

83. कवडीही हातास न लागणे - एका पैशाचीही प्राप्ती न होणे.वाक्य चोरांनी एका घरात चोरी केली मात्र एक कवडीही त्यांच्या हातास लागली नाही.

84. कान देणे - लक्षपूर्वक ऐकणे.वाक्य गुरुजींनी सांगितलेली गोष्ट मुलांनी कान देऊन ऐकली.

85. काळ पालटणे - रूप पालटणे.वाक्य हातात पैसा आला की आपली माणसे सुद्धा काळ पलटतात.

86. कालवा करणे - गोंधळ करणे.वाक्य चार लहान मुले एकत्र जमले की,कालवा करण्यास सुरु करतात.

87. कानाडोळा करणे - लक्ष न देणे.वाक्य दिनेशने शिक्षकांना सुरेशच्या खोडीबद्दल सांगण्याचा खूप प्रयत्न केला मात्र शिक्षकांनी त्याच्याकडे कानाडोळा केला.

88. कासावीस होणे - व्याकूळ होणे.वाक्य - उन्हात फिरून कोठेही पाणी न मिळाल्याने कावळ्याचा जीव तहानेने  कासावीस झाला.

89. कोप-यापासून हात जोडणे - संबंध न यावा अशी इच्छा करणे.वाक्य शरदचे त्याच्या मित्राशी भांडण झाल्यामुळे, त्याने मित्राला कोपऱ्यापासून हात जोडले.

90. कंठ दाटून येणे - गहिवरून येणे, दुःखाचा आवेग येणे.वाक्य – आपल्या स्वर्गवासी झालेल्या आईची आठवण येताच नंदाचा कंठ दाटून आला.

91. कंबर कसणे - हिंमत दाखविणे, तयार होणे.वाक्य शाळेचे क्रीडांगण स्वच्छ करण्यासाठी मुलांनी कंबर कसली.

92. कदर करणे :- शाळेत मुलांच्या चांगल्या गुणांची शिक्षक नेहमी कदर करतात.

93. करुणा उत्पन्न होणे : रस्त्यावरच्या भिकाऱ्याचे दारिद्रय पाहून सर्वांच्या मनात करुणा उत्पन्न झाली.

94. कमाल करणे :- चित्रपटात सुंदर अभिनय करून नवीन अभिनेत्रीने अगदी कमाल केली.

95. कच खाणे :- उंच डोंगरावरून उतरताना संपतच्या मनाने कच खाल्ली.

96. कचरणे :-नवीन शहरातून एकट्याने फिरण्यास सदूचे मन कचरले.

97. कपाळमोक्ष होणे :- उंच झाडावरून कोसळल्यामुळे नारळ तोडणाऱ्या कामगाराचा कपाळमोक्ष झाला.

98. कलाटणी मिळणे : शंकरला पाच लाखाची लॉटरी लागताच त्याच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळाली.

99.कष्टाचे खाणे :- शेतकरी तुकाराम शेतात राब राब राबतो व कष्टाचे खातो.

100. कळी खुलणे :- आईने आणलेले सुंदर कपडे पाहून लहानशा कोमलची कळी खुलली.

101. काबाडकष्ट करणे :-अर्थ-खूप मेहनत करणे.वाक्य-तुकारामने खूप काबाडकष्ट करून आपल्या मुलाला शिकवले.

102. काटकसर करणे :- वडिलांच्या पगारात महिन्याचा घरखर्च करताना आई नेहमी   काटकसर करते.

103. काबीज करणे :-शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या मदतीने शेवटी तोरणा गड काबीज केला.

104.कागाळी करणे :- सतीषने खेळणी तोडली, अशी राणीने आईकडे कागाळी केली.

105. कालबाह्य ठरणे :- मोबाईलच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या टेलिफोन कालबाह्य ठरू लागला आहे.

106. काहूर उठणे : काही दिवसातच सुनामी येणार, या अफवेने लोकांमध्ये काहूर उठले.

107. कामाचे चीज होणे :- नवोदय परीक्षेत रवीला यश मिळाले त्याने रात्रंदिवस केलेल्या कामाचे चीज झाले.

108. काया झिजवणे :- मदर तेरेसांनी अनाथ बालकांसाठी आयुष्यभर आपली काया झिजवली.

109. काळजी घेणे :- आई आयुष्यभर आपल्या मुलांची काळजी घेत असते.

110. काळजात चर्र होणे :- मामाच्या अ़क्सिडेंटची बातमी ऐकताच रमाच्या काळजात चर्र झाले.

111. कुरकुर करणे :- आज चॉकलेट खायला मिळाले नाही ; म्हणून दिनू दिवसभर कुरकुर करत होता.

112.कुरवाळणे :- मुलाच्या चांगल्या कामगिरी नंतर आईने मुलाला मायेने कुरवाळले.

113.कूस धन्य करणे :- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन अनेक देशभक्तांनी आपल्या आईची  कूस धन्य केली.

114. कोरडे ठणठणीत पडणे :- उन्हाळ्यात आमच्या गावातील विहिरी कोरड्या ठणठणीत पडतात.

115. कौतुक वाटणे :- दिनेश एवढ्या लहान वयात उत्तम सूत्रसंचालन करतो याचे सर्वांना कौतुक वाटले.

116. खजील होणे :- आपण केलेली चोरी उघडकीस आल्यावर प्रभाकर खजील झाला.

117. ख्याती असणे :- सचिन तेंडुलकर यांची क्रिकेट खेळात खूप ख्याती आहे.

118. खटके उडणे :- सखाराम व तुकाराम या सख्या भावांमध्ये नेहमी छोट्या मोठ्या कारनावरून खटके उडतात.

119. खंडाने जमीन घेणे :- राम काकांनी पोलिस पाटलांची जमीन खंडाने घेतली.

120. खडान्खडा माहिती :- शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना चोरवाटांची खडान्खडा माहिती होती.

121. खांद्याला खांदा लावून काम करणे :- गावातील रस्त्याचे काम करताना गावकऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले.

122. खेटून उभे राहणे :- शीतल आपल्या भावाला अगदी खेटून उभी होती.

123.खेद प्रदर्शित करणे :- वेळेवर बातम्यांचे प्रसारण न झाल्यामुळे टीव्ही चॅनलने प्रेक्षकांकडे खेद प्रदर्शित केला.

124. खेळ रंगात येणे :- दुपारी मुलांचा लगोरीचा खेळ रंगात आला.

125.खोड मोडणे :- नेहमी कुत्र्याला दगड मारणाऱ्या संजयच्या अंगावर जेव्हा कुत्रा धावून गेला, तेव्हा त्याची खोड मोडली.

126.गप्पांना भरती येणे :- खूप दिवसांनी एकत्र जमलेल्या मित्रांच्या गप्पांना भरती आली.

127. गयावया करणे :- चोर स्वत:ला सोडण्यासाठी पोलिसांकडे गयावया करत होता.

128.गलबलणे :- अपघातात रस्त्यावर पडलेले जखमी कुटुंब पाहून माणसे गलबलली.

129. गर्दी पांगवणे :- पोलिसांनी मतदानाच्या ठिकाणी झालेली गर्दी पांगवली.

130. गट्ट करणे :- आईने डब्यात ठेवलेले चार लाडू छोट्या रामने गट्ट केले.

131. गस्त घालणे :- गावात हाणामारी होऊ नये ; म्हणून पोलीस गस्त घालत होते.

132.गडप होणे :- सिंहाला पाहून पाहून हरिणाचा कळप लगेच गडप झाला.

133.गर्भगळीत होणे :- अचानक अंगावर आलेल्या वाहनाला बघून शंकर गर्भगळीत झाला.

134.गरज भागणे :- रामुच्या घराशेजारी असलेल्या बोअरवेलमुळे दिनेशच्या पाण्याची  गरज भागली.

135.गहिवरणे :- अनेक वर्षानंतर परदेशातून आलेल्या आपल्या मुलाला पोटाशी धरताना रामकाकू गहिवरल्या.

136. गाडी अडणे :- परीक्षेत एका प्रश्नाचे उत्तर लिहिताना रामची गाडी अडली.

137. गांगरून जाणे :- शेतात भला मोठा साप पाहून छोटा रवी गांगरून गेला.

138. गाढ झोपणे :- दिवसभर क्रिकेट खेळल्यामुळे सतीश रात्री गाढ झोपला.

139.गाव गोळा होणे :-गावात आलेला पैलवानाचा खेळ पाहण्यासाठी सारा गाव गोळा झाला.

140. गाडून घेणे :- परीक्षा जवळ आल्यामुळे शंकरने स्वतःला अभ्यासात गाडून घेतले.

141. गोंगाट करणे :- दुपारच्या सुट्टीत मुले मैदानात गोंगाट करत होती.

142. गौरव करणे :- बारावीच्या परीक्षेत सूरज राज्यात पहिला आल्यामुळे मुख्याध्यापकांनी सुरजचा गौरव केला.

143.घाम गाळणे :- कारखान्यात मजूर दिवसभर घाम गाळतात.

144.घायाळ होणे :- सिंहाच्या तावडीत सापडलेले हरणाचे पिल्लू आपला जीव वाचवता वाचवता घायाळ झाले.

145. घोकत बसणे :- सरांनी दिलेले इंग्रजीचे शब्द सतीश घरी जाऊन घोकत बसला.

146. घोकंपट्टी :- उद्या इतिहासाचा पेपर असल्याने रवी घोकंपट्टी करत होता.

147. चक्कर मारणे :- गावाकडे गेलो की,मी आमच्या शेताकडे चक्कर मारतो.

148. चरणांवर मस्तक ठेवणे :- मी शिर्डीला जाऊन साईबाबांच्या चरणांवर मस्तक ठेवतो.

149. चाचपडत राहणे :- घरातील लाइट गेल्यामुळे आजोबा आपला चश्मा चाचपडत होते.

150. चांगले दिवस येणे :- सतीश नोकरी लागल्यामुळे सतिशच्या कुटुंबाला चांगले दिवस आले.

      (भाग 2 साठी येथे क्लिक करा. )

 

यांसारख्या महत्त्वपूर्ण pdf file डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...