Saturday, May 13, 2023

विशेषण व विशेषणाचे प्रकार.

 विशेषण व विशेषणाचे प्रकार.

 
visheshan-v-tyache-prakar
visheshan-v-tyache-prakar

विशेषण:- नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ‘विशेषण’ असे म्हणतात किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात.

उदा. कुत्रा काळा आहे.या वाक्यात कुत्रा हा शब्द नाम असून ‘काळा’ हा शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणून ‘काळा’ हा शब्द विशेषण आहे.

आणखी काही विशेषणाची उदाहरणे

चांगला मुलगा,पांढरा ससा,हिरवे रान,सुंदर हरिण,कडू कारले इत्यादी.

वरील उदाहरणात चांगला,पांढरा,हिरवे,सुंदर,कडू इत्यादी शब्द विशेषण आहेत.

विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात.

(1)गुण विशेषण (2)संख्या विशेषण (3)सार्वनामिक विशेषण

(1) गुण विशेषण :- ज्या विशेषणामुळे नामाच्या ठिकाणचा कोणताही विशेष किंवा गुण दाखविला जातो,त्यास ‘गुण विशेषण’असे म्हणतात.

जसे-धूर्त कोल्हा,कडू कारले,सुंदर मुलगी,गोड आंबा इत्यादी.

वरील उदहरणामध्ये धूर्त,कडू,सुंदर,गोड हे शब्द गुण विशेषण आहेत.

(2) संख्या विशेषण :-नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला ‘संख्या विशेषण’असे म्हणतात.

जसे-शंकरचा पहिला नंबर आला.

वरील वाक्यात पहिला हा शब्द संख्या विशेषण आहे.

संख्या विशेषणाचे खालील पाच प्रकार पडतात.

(अ)गणवाचक

(आ)क्रमवाचक

(इ)आवृत्तीवाचक

(ई)पृथकत्ववाचक

(उ)अनिश्चित

(अ)गणवाचक विशेषण :-नामाची विशिष्ट प्रकारे गणना करणाऱ्या शब्दाला ‘गणवाचक विशेषण’असे म्हणतात.

गणवाचक विशेषणाचे तीन प्रकार पडतात.

(1)     पूर्णांक वाचक :-जसे-एक गोटी,दहा किलो,शंभर कौरव इत्यादी.

(2)     अपूर्णांक वाचक :-जसे-पाऊण तास,पाव किलो,अर्धा रस्ता इत्यादी.

(3)     साकल्यवाचक :– जसे-पाची पांडव,दोघं भाऊ,दाही दिशा इत्यादी.

(आ)क्रमवाचक विशेषण -वस्तूंचा क्रम दाखविणाऱ्या विशेषणास ‘क्रमवाचक विशेषण’असे म्हणतात.

जसे – चौथा वर्ग,पहिला मजला,दुसरी गल्ली इत्यादी.

(इ)आवृत्तीवाचक विशेषण :-संख्यांची आवृत्ती दाखविणाऱ्या विशेषणास ‘आवृत्तीवाचक विशेषण’असे म्हणतात.

जसे- चौपट नाणी,दुप्पट रक्कम,सातपट मुले इत्यादी.

(ई)पृथकत्ववाचक विशेषण :-वेगवेगळेपणा दाखविणाऱ्या विशेषणास ‘पृथकत्ववाचक विशेषण’असे म्हणतात.

जसे-पाच-पाचचा गट ,पन्नास-पन्नासच्या नोटा,एकेक वीर इत्यादी.

(उ)अनिश्चित विशेषण :-निश्चित संख्या न दाखविणाऱ्या विशेषणास ‘अनिश्चित विशेषण’असे म्हणतात.

जसे-पुष्कळ माणसे,असंख्य घरे,सर्व झाडे,फार वाहने इत्यादी.

 

(3)सार्वनामीक विशेषण :-एखाद्या नामाच्या मागे जेव्हा त्याचे गुणवर्धन करण्यासाठी एखादे सर्वनाम येते,तेव्हा त्याचे कार्य विशेषणासारखे असते. म्हणून त्यांना ‘सार्वनामीक विशेषण’असे म्हणतात.

जसे – ती मुलगी, तो कोल्हा,कोणता देश,हा मनुष्य इत्यादी.

वरील शब्दातील ती,तो,कोणता,हा या सर्वनामापासून सार्वनामिक विशेषणे तयार झाली आहेत.

सार्वनामीक विशेषणे

मी-माझा,माझे,माझी,माझ्या

तो-त्याच्या,त्याची,त्याचे,त्याच्या

तुम्ही-तुमचा,तुमचे,तुमच्या,तुमची

हा-असा,असला,इतका,एवढा,अमका

जो-जसा,जसला,जितका,जेवढा.

काय-कसा,कसला.

तू-तुझा,तुझे,तुझ्या,तुझी.

आम्ही-आमचा,आमचे,आमच्या.

ती-तिच्या,तिचा,तिचे.

तो-तसा,तसला,तितका,तेवढा,तमका.

कोण-कोणता,केवढा

विशेषण व विशेषणाचे प्रकार pdf file डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...